तूर पिकावरील कीड नियंत्रण

तुरीवरील किडींचे एकात्मिक नियंत्रण व्यवस्था न

सध्याच्या काळात तूर पिकाच्या अवस्थेनुसार विविध किडींचा प्रादुर्भाव होतो. वेळीच उपाय केल्यास पिकाचे होणारे नुकसान टाळणे शक्य होते. त्यांची माहिती पुढीलप्रमाणे.

पाने व फुले जाळी करणारी अळी

किडीचे नाव- मारूका वा ठिपक्याची शेंगा पोखरणारी अळी
जीवनक्रम- प्रौढ मादी पतंग पिवळसर रंगाची. उभट आकाराची अंडी पुंजक्यात शक्यतो झाडाच्या शेंड्यावर घालते.
अळी १४ मिमी. लांबीची. हिरवट पांढरी व दोन्ही बाजूस काळे ठिपके. अळी अवस्था १२ ते १४ दिवस.
पतंग अवस्था ६ ते ७. किडीचा जीवनक्रम २६ ते ३१

नुकसान

पीक फुलोऱ्यात येण्याच्या कालावधीत जास्त आर्द्रता व मध्यम तापमानात प्रादुर्भाव (अनुकूलता सप्टेंबर ते ऑक्टोबर)
-अळी पाने, फुले, कळ्या व शेंगा यांचा एकत्र गुच्छ तयार करून त्यात लपून बसते. कोवळे शेंडे, पाने एकमेकांना चिकटल्याने खोडाची वाढ खुंटते. तेथील फुले निस्तेज दिसतात व शेंगांची वाढ होत नाही. पाच ते २५ टक्क्यांपर्यंत उत्पादनात घट होऊ शकते.

शेंगा पोखरणारी अळी

बहुभक्षी कीड. सुमारे २०० पिकांवर (तूर, कापूस, भेंडी, टोमॅटो, सोयाबीन, हरभरा आदी) पिकांवर प्रादुर्भाव
जीवनक्रम- अंडी, अळी, कोष व पतंग.
अळी रंगाने हिरवट पिवळसर. अंगावर तुरळक समांतर रेषा. पूर्ण वाढ झालेली अळी ४ सेंमी. लांब
वर्षातून सात ते ९ पिढ्या तयार होतात.
-मादी सरासरी ८०० अंडी कोवळी पाने, देठे किंवा कळ्या, फुले, शेंगांवर घालते.
चार ते सात दिवसांनी अंड्यातून अळ्या बाहेर पडतात. १४ ते १६ दिवसांपर्यंत पूर्ण वाढ होवुन त्या झाडाच्या बुंध्याजवळ जमिनीत मातीच्या वेष्टनात कोषावस्थेत जातात. कोषातून पतंग बाहेर पडतात. जीवनक्रम ४ ते ५ आठवड्यांत पूर्ण होतो.

नुकसान

प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळ्या तुरीची कोवळी पाने खातात. पीक फुलोऱ्यात आल्यावर कळ्यांवर उपजीविका करतात. – शेंगांना छिद्र पाडून अर्धे शरीर बाहेर व अर्धे आत ठेवून दाणे खाते. मोठया अळ्या दाणे पोखरून खातात.
प्रति अळी ३० ते ४० शेंगांना नुकसान पोचवून अळी अवस्था पूर्ण करते. ढगाळ वातावरणात संख्या वाढून जास्त प्रादुर्भाव असल्यास २५ ते ७० टक्क्यापर्यंत पिकाचे नुकसान होऊ शकते.
नियंत्रण

यांत्रिक पद्धती

पाने गुंडाळणाऱ्या अळीची प्रादुर्भावग्रस्त पाने गोळा करून अळीसह नष्ट करावीत.
शेताच्या बांधावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीची पर्यायी खाद्य तणे उदा. कोळशी, रानभेंडी, पेटारी वेळोवेळी काढून नष्ट करावीत.
कळी लागण्याच्या अवस्थेत आल्यापासून एकरी २ कामगंध सापळे व २ नरसाळे सापळे पिकाच्या एक फूट उंचीवर लावावेत. जेणेकरून शेंगा पोखरणारी अळी व मारूकाची आर्थिक नुकसानीची पातळी कळेल.
शक्य असल्यास तुरीवरील मोठया अळ्या वेचून नष्ट कराव्यात.
तुरीच्या झाडाखाली पोते टाकून हलकेसे झाड हलवावे. पोत्यावर पडलेल्या अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात.
पक्षी बसण्यासाठी पिकाच्या एक ते दोन फूट उंचीवर पक्षी थांबे हेक्टरी ५० ते ६० ठिकाणी उभारावेत.

जैविक पद्धती

फूलकळी येऊ लागताच प्रतिबंधात्मक उपाय- ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ॲझाडिरॅक्टिन (३०० पीपीएम) ५० मि.ली. प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी.
दुसरी फवारणी- शेंगा पोखरणारी हिरवी अळी प्रथम व द्वितीय अवस्थेत असताना- एच.ए.एन.पी.व्ही. विषाणू- ५ मिली प्रति १० लिटर पाणी. - फवारणी सायंकाळी करावी. हे विषाणूजन्य कीटकनाशक अन्नाद्वारे पोटात जाऊन अळीच्या शरीरात विषाणूंची वाढ होते. त्यामुळे अळ्या ५-७ दिवसांत मरतात.

रासायनिक पध्दत :
किडींची संख्या आर्थिक नुकसान पातळीच्या वर जात असल्यास
शेंगा पोखरणारी अळी

फवारणी प्रति १० लिटर पाणी
इमामेक्टीन बेन्झोएट (५ एसजी) ४.४ ग्रॅम किंवा फ्ल्यूबेंडिअमाईड -(३९.३५ एससी) २ मिली
किंवा क्लोरॲंट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ३ मिली किंवा लॅंबडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के इसी)- ८ मि.ली
मारूका व शेंगा पोखरणारी अळी- इंडोक्झाकार्ब (१५.८ इसी)- ६.६६ मि.ली
आर्थिक नुकसानीची पातळी

शेंगा पोखरणारी अळी (घाटे अळी)- कामगंध सापळ्यात सलग २ ते ३ दिवस ८ ते १० पतंग प्रति सापळा किंवा फुलोऱ्याच्या वेळी अथवा फुलोऱ्यानंतर १ अळी प्रति झाड किंवा १० टक्के कीडग्रस्त शेंगा
मारूका व ठिपक्याची शेंगा पोखरणारी अळी- १-२ अळ्या प्रति झाड
महत्त्वाच्या टिप्स

पीक ५० टक्के फुलोऱ्यात असताना जैविक कीटकनाशकाची फवारणी करावी.
प्रथम व द्वितीय अवस्थेतच शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण करावे.
फवारणी करताना हातमोजे व तोंडावर मास्कचा वापर करावा.
कीटकनाशकांचे प्रमाण नॅपसॅक पंपासाठी आहे.