सोयाबीन पिकावरील -
तंबाखू वरील पाने खाणारी अळी
(स्पोडोप्टेरा लिटुरा)
सोयाबीन पिक हे गळीतवर्गीय पीकापैकी एक प्रमुख पीक असून त्यामध्ये कमी उत्पादकतेच्या अनेक कारणांपैकी किडींमुळे होणारे नुकसान हे प्रमुख कारण आहे. सोयाबीन पीकावर प्रामुख्याने खोड माशी, चक्री भुंगा, ऊंट अळी, पाने गुंडळणारी अळी, शेंगा पोखरणारी अळी (हिरवी अळी), तंबाखू वरील पाने खाणारी अळी (स्पोडोप्टेरा ) अशा विविध किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. वरील कीडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास ७० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान होऊ शकते, म्हणून सोयाबीन पिकावरील किडींची ओळख करून त्याचे वेळीच एकात्मिक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
तंबाखू वरील पाने खाणारी अळी
(स्पोडोप्टेरा लिटुरा)
किडीचे शास्त्रीय नाव - Spodopetra litura
(स्पोडोप्टेरा लिटुरा)
भारतामध्ये या किडीचा प्रादुर्भाव तंबाखू पिकावर नेहमी व मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे तिला तंबाखूवरील पाने खाणारी अळी असे म्हणतात.
प्रादुर्भावाची वेळ
या किडीचा प्रादुर्भाव साधारणपणे ऑगस्ट ते आक्टोबर महिन्यात अधिक दिसून येतो. दिवसा या अळ्या पानांखाली अथवा जमिनीत लपून राहतात. रात्री बाहेर पडून नुकसान पोचवतात. या किडींचा प्रादुर्भाव कळ्या व फुले लागल्यापासून शेंगांपर्यंतच्या काळात आढळून येतो.
त्यासाठी पिकाचे नियमित सर्वेक्षण करावे.
तसेच कीटकनाशकांचा अति आणि निष्काळजीपणे केलेल्या वापरामुळे ह्या किडी मध्ये काही कीटकनाशका प्रति प्रतिकारक्षमता निर्माण झाली आहे.
केवळ कीटकनाशकांचा वापराने कीड नियंत्रण करता येते असे नसून, याशिवाय अनेक दुसऱ्या पद्धती देखील अवलंबिता येतात यासाठी या किडीचा जीवनक्रम, नुकसानीचा प्रकार, यजमान पिके, मित्र किडी व या किडीचे एकात्मिक व्यवस्थापन याबाबतची माहिती असणे आवश्यक आहे.
जीवनक्रम:eight_spoked_asterisk:
ह्या किडीचे जीवनक्रम अंडी, अळी, कोष व पतंग या चार अवस्थेत पुर्ण होते
अंडी-
या पतंग किडीची मादी रात्रीच्या वेळी पानाच्या खालच्या बाजूस शिरेजवळ पुंजक्याने अंडी घालून, त्यावर केसाळ मळकट तपकिरी रंगाचे आवरण घालते. अंडी फिक्कट पिवळ्या रंगाची साबुदाण्याच्या आकाराची असतात.
एक मादी पतंग जवळपास 2100 अंडी तीन ते चार पुंजक्यांत घालते. एका पुंजक्यात सुमारे 300 ते 600 अंडी असतात.
अळी-
अंड्यातून दोन ते तीन दिवसांनी अळ्या बाहेर पडतात. लहान अळ्या सुरवातीस समूहाने राहतात, या अळ्या हिरव्या असून, त्यांचे डोके काळे असते. पूर्ण वाढलेली अळी गडद तपकिरी किंवा हिरवट पांढरी असते. आळीच्या शरीरावर फिक्कट 5 रेषा आढळून येतात. एक रेषा पाठीवर मध्यभागी व शरीराच्या दोन्ही बाजूस दोन-दोन रेषा असतात. तसेच शरीराच्या दोन्ही बाजूने प्रत्येक वलयावर काळा टिपका व त्याच्या वरच्या बाजूस त्रिकोणी ठिपका असतो. तसेच त्यांचे शरीर गुळगुळीत असते.
अळी पाच वेळा कात टाकून 20 ते 22 दिवसांनी जमिनीमध्ये कोषावस्थेत जाते.
कोष-
कोष लालसर तपकिरी असतात. कोषावस्था 8 ते 10 दिवसांची असते
पतंग -
किडीचा पतंग मध्यम आकाराचा असून, पुढचे पंख तपकिरी रंगाचे असून त्यावर सोनेरी रंगाचे गडद चट्टे व रेषा असतात व मागचे पंख पांढऱ्या रंगाचे असून कडा तपकिरी रंगाचे असतात.
किडीचा पूर्ण जीवनक्रम 31 ते 33 दिवसांत पूर्ण होतो. किडीचा पतंग व अळ्या दिवसा सूर्यप्रकाशाच्या वेळी जमिनीमध्ये, पानांखाली लपून राहतात व रात्री बाहेर निघतात. एका वर्षामध्ये या किडीच्या सहा ते आठ पिढ्या तयार होतात.
नुकसानीची पध्दत:eight_spoked_asterisk:
अंड्यातून दोन ते तीन दिवसांनी अळ्या बाहेर पडतात.
लहान अळ्या सुरवातीस समूहाने राहतात
अंड्यांतून निघालेल्या सुरवातीच्या अवस्थेतील अळ्या समूहाने पानाचे पानाच्या खालचा भाग म्हणजे हरितद्रव्य
खरवडून पूर्णपणे खाऊन टाकतात.
असे पान पातळ पांढऱ्या कागदासारखे दिसते. तसेच पानाची जाळी तयार होते.
परंतु पानास छिद्र पाडत नाहीत.
मोठ्या झाल्यानंतर (साधारणपणे तिसऱ्या व त्यापुढील अवस्था) विखरून एकएकट्या पाने खातात.
मोठ्या अळ्या पानावर मोठे छिद्र पाडून खातात.
प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असेल तर झाडाची पूर्ण पाने खाऊन फक्त शिराच शिल्लक राहिलेल्या दिसतात.
फुले व शेंगा लागल्यानंतर ते सुद्धा खातात.
इतर यजमान (खाद्य) पिके:eight_spoked_asterisk:
ही कीड बहुभक्षी असून तूर, मूग, उडीद, भुईमूग, एरंडी, सोयाबीन, कपाशी, तंबाकू, सूर्यफूल, करडई तसेच टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, मिरची, बटाटा इत्यादी पिकावरही येते.
प्रादुर्भावास कारणीभूत घटक
एकच एक पीक पद्धतीमुळे ही कीड आपला जीवनक्रम पूर्ण करू शकते.
सलग रिमझिम पाऊस व सततचे ढगाळ वातावरण या किडीस पोषक असते.
अधिक आद्रता असलेल्या वातावरणात या किडीची वाढ झपाट्याने होते.
एकाच गटातील कीटकनाशकांचा अतिवापरामुळे या किडीच्या प्रतिकार क्षमते मध्ये वाढ होते
एकात्मिक कीड व्यवस्थापन
मशागातीय पध्दत
पीकाची फेरपालट करावी
वेळेवर अंतरमशागत करून कीड ज्या तणावर उपजीविका करतात अशा तणांचा नाश करून पीक तणविरहित करावे.
दोन ओळीतील आणि झाडातील अंतर योग्य ठेवावे. जेणेकरून पीक दाटणार नाही.
मृद परीक्षणानुसार खताच्या मात्रा द्याव्यात व जास्त नत्राचा वापर टाळावा
मुख्य पिकाभोवती एरंडी आणि सूर्यफूल या सापळा पिकाची एक ओळ लावावी आणि त्यावर तंबाखू वरील पाने खाणारी आळी याची प्रादुर्भावग्रस्त पाने अंडी व आळ्यासहित नष्ट करावीत
यांत्रिक पद्धत
स्पोडोप्टेरा या कीडींचा पतंग एकाच पानावर पुंजक्याने अंडी घालतात व त्यातून बाहेर पडलेल्या अळ्या सुरुवातीला एकाच पानावर बहुसंख्य असतात. अशी अंडी व अळीग्रस्त पाने अलगद तोडून नष्ट करावेत.
पीक एक महिन्याचे झाल्यावर पिकामध्ये ठिकठिकाणी पिकापेक्षा अधिक उंचीची टी (T) आकाराचे साधारणपणे एक ते दीड उंचीचे हेक्टरी ५० ते ६० पक्षी थांबे उभा करावेत, यामुळे पक्षी अळ्यांचे भक्षण करतील.
एकरी पिकामध्ये दोन कामगंध सापळे (फेरोमोन ट्रप) लावावे. सापळ्यांमध्ये प्रतिदिन ८-१० पतंग सतत २-३ दिवस आढळल्यास किडीच्या नियंत्रणाची उपाययोजना करावी. सापळ्यात जमा झालेले पतंग नष्ट करावेत.
जैविक पद्धत
स्पोडोप्टेरा च्या अळीसाठी एस.एल.एन.पी.व्ही. (500 एल.ई.) विषाणूजन्य कीटकनाशकाची 20 मि.लि. प्रति 10 लिटर पाणी प्रमाणे हेक्टरी 500 लिटर पाणी घेऊन फवारणी करावी आणि त्यामध्ये नीळ 100 ग्रॅम टाकावी.
कडूनिंबाच्या ५ % अर्काची किंवा अझाडिरेक्टीन घटकावर आधारित कीडनाशक 1500 पीपीएम 40 मि.लि. किंवा 3000 पीपीएम 25 मि.लि. प्रति 10 लिटर या प्रमाणात पहिली फवारणी पिक वाढीच्या अवस्थेत असताना व दुसरी फवारणी १५ दिवसाच्या अंतराने किंवा पिक ५० % फुलोऱ्यात असताना फवारणी करावी.
बॅसीलस थुरीन्जिएन्सीस (सीरोटाईप एच-३९, ३ बी स्ट्रेन झेड- ५२) १.५ ग्रॅम प्रति लिटर फवारणी करावी.
मेटारायझियम, बिव्हेरिया बासीयाना, नोमुरिया रिलेयी या जैविक बुरशी कीटकनाशकांची फवारणी अळी दिसल्यावर २५० ते ५०० ग्रॅम प्रति १०० लिटर पाण्यातून करावी
रासायनिक पद्धत
ज्यावेळी इतर नियंत्रणाचे उपाय निष्प्रभ ठरते तसेच 8 ते 10 पतंग प्रति कामगंध सापळ्यात सतत 2 ते 3 दिवस आढळल्यास ती आर्थिक नुकसानीची पातळी समजून गरजेनुसार रासायनिक कीटकनाशक वापरावेत.
रासायनिक कीटकनाशकांची फवारणी पट्टा पद्धतीने किंवा खंड पद्धतीने केल्यास परोपजीवी किडींच्या संवर्धनास मदत होते. त्यासाठी पुढील प्रमाणे किटकनाशकांची फवारणी करावी
क्विनॉलफॉस २५ ई. सी. (क्विनालटाफ, क्लिक, स्मॅश) २० मिली
किंवा
प्रोफेनोफॉस 50 टक्के प्रवाही (क्युराँक्रोन, प्रबल, प्रहार, प्रोफेक्स) 25 मि.लि.
किंवा
इमामेक्टीन बेण्झोएट ५ एस.जी. (प्रोक्लेम,डेरिम,सफारी, हिलक्लेम) 4 ग्रॅम
किंवा
इंडोक्झाकार्ब 14.5 एस.सी. (अवांट, दक्ष, धावा) 6 मि.ली
किंवा
क्लोरॅन्ट्रीनीलीपोल १८.५ एस.सी. (कोराजन) 2 मि.ली.
प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून नॅपसॅक पंपाने फवारणी करावी.
चार्जिंग पंपासाठी किटकनाशकांची मात्रा दुप्पट करावी
पावर स्प्रे पंपासाठी किटकनाशकांची मात्रा तीनपट करावी.
एकावेळी एकाच किटकनाशकांची फवारणी करावी
वरील किटकनाशकांची फवारणी करताना एकच कीटकनाशक सतत न वापरता आलटून पालटून कीटकनाशके वापरावी
सदरील किटकनाशके फवरताना पिकावरील फुले, कळ्या व शेंगापर्यंत पोचेल, याची काळजी घ्यावी.
तालुका कृषी अधिकारी कार्यालय,अंबड