सौजन्य : अॅग्रोवन
दि. 10 एप्रिल 2025
‘स्कायमेट’ या खाजगी हवामान अंदाज संस्थेने २०२५-२६ च्या मॉन्सून हंगामाचा पहिला अंदाज जाहीर केला आहे. स्कायमेटने देशात जून ते सप्टेंबर या मॉन्सून हंगामात दीर्घकालीन कालावधीच्या सरासरी १०३ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये ५ टक्के वाढ किंवा तूट होऊ शकते. म्हणजे ५ टक्के कमी अधिक पावसाची तफावत गृहीत धरण्यात आली आहे. तसेच जून ते सप्टेंबर या कालावधीत दीर्घकालीन ८६५.६ मिलीमीटर पाऊस पडेल, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.राज्यात एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात सूर्याने आग ओकायला सुरूवात केली आहे. तर सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होऊ लागली आहे. मागील वर्षीच्या मॉन्सून हंगामात पावसाने साथ दिल्याने आगामी मॉन्सूनच्या हंगामाबद्दल शेतकऱ्यांना आतुरता लागली आहे.भारतीय हवामानशास्त्र विभाग लवकरच मॉन्सूनचा अधिकृत अंदाज जाहीर करेल, अशी शक्यता आहे. आत्ता मात्र स्कायमेटने मॉन्सून हंगामात सरासरी १०३ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे यंदाही मॉन्सून हंगामात पाऊस शेतकऱ्यांना साथ देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.स्कायमेटच्या अंदाजानुसार देशाच्या पश्चिम आणि दक्षिण भागात चांगला मॉन्सून बरसण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात पुरेसा तर पश्चिम घाट केरळ, कर्नाटक किनारपट्टीचा भाग आणि गोव्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस राहील. तसेच उत्तरेकडील राज्य आणि पर्वतीय भागात मात्र सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.
महिनावार पावसाचे अंदाज काय?
स्कायमेटने मॉन्सून हंगामात सरासरी १०३ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे. परंतु महिन्यावर अंदाजात जूनमध्ये सरासरीच्या ९६ टक्के पावसाचा अंदाज दिला आहे. जुलै महिन्यात सरासरी १०२ टक्के पावसाची पावसाची शक्यता आहे. म्हणजेच २८०.५ मिलीमीटर तर ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच १०८ टक्के पावसाच्या नोंदीचा अंदाज आहे. ऑगस्टमध्ये २५४.९९ मिलीमीटर पावसाचा अंदाज आहे. तसेच सप्टेंबरमध्ये मात्र १०४ टक्के म्हणजेच १६७.९ मिलीमीटर पावसाचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.
स्कायमेटचे व्यवस्थापकीय संचालक जतीन सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, “ला निना या हंगामात कमकुवत होता. तसेच ला निनाची चिन्ह धूसर होऊ लागली आहेत. मॉन्सूनवर विपरीत परिणाम करणाऱ्या एल-निनोची शक्यता नाही. एल-निनो दक्षिण दोलनावर न्यूट्रल राहणार असल्यानं आणि ला निना प्रभावी नसल्याने भारतात मॉन्सूनचा पाऊस चांगला होऊ शकतो.” असा अंदाज सिंह यांनी वर्तवला आहे.
पुढे सिंह यांनी एल-निनो दक्षिणी दोलन प्रभावी नसणं आणि त्याचवेळी आयओडी सकारात्मक असल्याने चांगला पाऊस येऊ शकतो, असा अंदाज वर्तवला आहे. मॉन्सूनच्या पहिल्या टप्प्यापेक्षा दुसऱ्या टप्प्यात चांगला पाऊस होण्याचा अंदाज सिंह यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, जून महिन्यात मॉन्सूनचा पाऊस नेहमीपेक्षा ४ टक्के कमी असण्याची शक्यता आहे. तर जुलै महिन्यात २ टक्के आणि ऑगस्टमध्ये ८ टक्के अधिक पाऊस बरसण्याची शक्यता आहे. तसेच सप्टेंबर महिन्यात ४ टक्के अधिक पाऊस पडेल असा अंदाजही स्कायमेटने वर्तवला आहे.
#स्त्रोत ऍग्रोवन