• बीज प्रक्रिया म्हणजे कायः बीज प्रक्रिया म्हणजे हलके, किडके, रोगमुक्त, आकाराने लहान असणारे बियाणे वेगळे करुन, निरोगी बियाणे, रोग व किडीपासून संरक्षण व्हावे म्हणून औषध लावण्यापर्यंतच्या प्रक्रियेला “बीजप्रक्रिया” म्हणतात.
• पिकांवरील रोगांना कारणीभूत असलेल्या बऱ्याच सूक्ष्मजीवांचा प्रसार बियांद्वारे होत असतो. जमिनीतून व बियाणेमार्फत पसरणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव कमी करून पिकांची सशक्त व जोमदार वाढ होण्यासाठी शेतकऱ्यांनी न विसरता बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे.
• निरनिराळ्या औषधांच्या फवारण्यामुळे उभ्या पिकावरील किडी व रोगांचे नियंत्रण होते तर बीजप्रक्रियेमुळे बियांवरील सुप्तावस्थेत असलेल्या रोगाचे तसेच इतर जीवाणू चे नियंत्रण सुरुवातीलाच होते.
• उभ्या पिकात दिसणाऱ्या बऱ्याच रोगांचे मूळ बियांमध्ये असते. एकदा असे रोगट बी उगवून आले की पिकात रोगांची लागण होऊन रोगांचे नियंत्रण करणे अवघड होते.
बीज प्रक्रियेचे फायदेः
- बीज अवस्थेमध्ये बियाण्यावर संस्करण केल्यास बुरशीजन्य रोग किंवा जमिनीमधून आणि बियाण्यांपासून उद्भवणाऱ्या रोगांची लागण कमी प्रमाणात होते.
- पेरणीसाठी एकसारखे बियाणे उपलब्ध होते व रोपे एकसारखी उगतात.
- बियाणे व रोगांद्वारे होणाऱ्या रोगांचे नियंत्रण करता येते.
- बियाण्याभोवती बुरशीनाशकाचे सुरक्षित कवच तयार होते परिणामी रोपे अवस्थेत होणारे नुकसान टाळता येते.
- पीक संरक्षणाचा खर्च कमी होतो.
- बीजप्रक्रियेमुळे नत्र, स्फुरद व इतर घटक पिकास लवकर उपलब्ध होऊन खतावरील खर्च कमी करता येते व पीक उत्पादनात वाढ होते.
- पिक एजोमात वाढते व मशागतीचा खर्च कमी येतो.