आंबा मोहर व्यवस्थापन
आंबा बागेत एकूण मोहर आलेल्या पैकी केवळ १% टक्केच फुलांचे रुपांतर फळात होते.
व नंतर लागलेल्या फळांना कीड व रोगांचे उपद्रव जास्त झाल्यास फळगळीचे प्रमाण वाढते.
खालीलप्रमाणे नियोजन करावे.
• मातीतील ओलाव्या अभावी झाडांना पुरेशा प्रमाणात पाण्याचा पुरवठा न झाल्याने नविन फळधारणा झालेल्या बागांमध्ये फळगळ होण्याची शक्यता असते. म्हणून फळधारणा झालेल्या आंबा बागेमध्ये वाटाणा ते सुपारी आकाराच्या फळाची गळ कमी करण्यासाठी, पाण्याच्या उपलब्धतेनुसार १५० ते २०० लिटर पाणी प्रति झाड याप्रमाणात १५ दिवसाच्या अंतराने ३ ते ४ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. तसेच झाडाच्या बुंध्याभोवती गवताचे अच्छादन करावे.
• हापूस आंब्यामध्ये फळगळ कमी करण्यासाठी फळे वाटाण्याच्या आकाराची झाल्यावर २० पीपीएम नॅप्थेलीन ऍसीटीक ऍसीड (१ ग्रॅम ५० लिटर पाण्यातून) या संजिवाचे द्रावण मोहोरावर फवारावे.
• दुसरी फवारणी फळे गोटीच्या आकाराची झाल्यावर करावी. नॅप्थेलीन ऍसीटीक ऍसीड प्रथम थोड्या अल्कोहोलमध्ये विरघळून नंतर पाण्यात मिसळावे.
• शिफारशीनुसार मोहोरलेल्या झाडांना फळगळ कमी होऊन चांगली फळधारणा होण्यासाठी विद्राव्य अन्नद्रव्याची १०० ग्रम. प्रती १० लि. पाणी या प्रमाणात फवारणी करावी. (सदर २० लि द्रावण हे चार मोहोरलेल्या झाडांसाठी वापरावे).
• चांगल्या प्रतिच्या आंबा फळाच्या उत्पादनाबरोबर आंब्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी १% पोटॅशिअम नायट्रेटची (१० ग्रॅम प्रति लिटर पाणी) फळे वाटाणा, गोटी व अंडाकृती अवस्थेत असताना अशा एकूण ३ फवारण्या कराव्यात.
• आंबा फळावर फळमाशीचा प्रादुर्भाव दिसुन येण्याच्या शक्यता आहे. अश्या वेळी बागेमध्ये गळलेली फळे गोळा करुन नष्ट करावीत आणि आंबा फळांचे फळमाशीपासून संरक्षण करण्यासाठी विद्यापीठाने शिफारस केलेले फळमाशी रक्षक सापळे प्रति एकरी @२० याप्रमाणात बागेमध्ये झाडाच्या खालील बाजूच्या फाद्यांवर लावावेत.
बागेतील कीड व रोग संरक्षण
आंबा बागांमध्ये मोहोरावर सामान्यत तुडतुडे कीड आणि भुरी रोग यांचा प्रादुर्भाव होतो.
तुडतुडे कीड आणि भुरी रोग यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यास मोहोर मोठ्या प्रमाणत गळून पडतो.
आंबा मोहोर संरक्षणाचे वेळापत्रक
अ. क्र. फवारणीची वेळ कीडनाशक प्रमाण प्रति १० लिटर पाणी शेरा
१ मोहोर दिसण्याच्या १५ दिवस आधी (संपूर्ण झाडावर) लॅम्बडा सायहॅलोथ्रीन १० मि.लि किंवा अॅझाडिरॅक्टिन (१००० पीपीएम) ५ मि.लि. खोडावर, फांद्यावर व पानांवर सर्वत्र कव्हरेज होईल, अशी फवारणी करावी.
२ डोळे फुटताच खोड, फांद्या व झाडावर गंधक (पाण्यात मिसळणारे) २० ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १० ग्रॅम अधिक थायामेथोक्झाम (२५ डब्ल्यूजी) ३ ग्रॅम यामुळे भुरी रोग आणि तुडतुड्याचे नियंत्रण होईल.
३ दुसऱ्या फवारणीनंतर सुमारे दोन आठवड्यांनी गंधक (पाण्यात मिसळणारे) २० ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १० ग्रॅम किंवा हेक्साकोनॅझोल ५ मि.लि. (यापैकी एक बुरशीनाशक) अधिक इमिडाक्लोप्रीड (१७.८ टक्के) ३ मि.लि. मोहोर उमलण्याच्या काळात फक्त बुरशीनाशक फवारावे. मात्र कीडनाशक वापरणे टाळावे, कारण त्याचा मधमाश्यांवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
४ तिसऱ्या फवारणीनंतर सुमारे दोन आठवड्यांनी गंधक (पाण्यात मिसळणारे) २० ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १० ग्रॅम किंवा हेक्साकोनॅझोल ५ मि.लि. (यापैकी एक बुरशीनाशक) अधिक थायामेथोक्झाम (२५ डब्ल्यूजी) १ ग्रॅम केसर आंबा बागेमध्ये भुरी रोगाचा प्रादुर्भाव अधिक हानिकारक असून, तुडतुडे तुलनेने कमी असतात. त्यामुळे केसर आंबा उत्पादकांचा मुख्य भर हा भुरी रोगाच्या नियंत्रणावर असावा. मराठवाड्याच्या तुलनेने तुडतुडे कोकणामध्ये जास्त असतात.
५ चौथ्या फवारणीनंतर दोन आठवड्यांनी गंधक (पाण्यात मिसळणारे) २० ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १० ग्रॅम किंवा हेक्साकोनॅझोल ५ मि.लि. (यापैकी एक बुरशीनाशक) अधिक बुप्रोफेझीन (२५ टक्के प्रवाही) २० मि.लि. –
६ पाचव्या फवारणीनंतर दोन आठवड्यांनी (गरज भासल्यास) गंधक (पाण्यात मिसळणारे) २० ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १० ग्रॅम किंवा हेक्साकोनॅझोल ५ मि.लि. (यापैकी एक बुरशीनाशक) अधिक डेल्टामेथ्रीन (२.८ टक्के इसी) ५ मि.लि. –