घोणस अळीचा दंश झालाय त्यावरील उपाययोजना

सध्या शेतकऱ्यांवर अनेक संकटे येत आहेत, यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कोरोना लम्‍पी हे सत्र सुरूच असताना आता घोणस अळीचा प्रभाव वाढला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. घोणस अळीचा विषारी दंश झाला तर मोठ्या अडचणींना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे.

ही अळी अनेक पिकांवर आढळत आहे. वर्धा जिल्ह्यात यावर्षी दरवर्षी पेक्षाही जास्त पाऊस होत आहे. पावसामुळे शेतातील बांधावर गवत वाढले आहे. या वाढलेल्या गवतात विषारी घोणस अळी आढळून येत आहे. यामुळे चिंता वक्त केली आहे. या आळीने चावा घेतला तर दंश झालेल्या ठिकाणी चिकट टेप हलक्या हाताने लावून काढून घ्यावा, यामुळे अळीचे केस सहजपणे निघून जातील.

यामुळे वेदना कमी होतील, ज्या ठिकाणी दंश झाला आहे त्या ठिकाणी बर्फ लावणे, बेकिंग सोडा व पाण्याची पेस्ट करून लावल्याने आराम मिळतो. याबाबत लक्षणे तीव्र असल्यास रुग्णालयात जावे आणि डॉक्टकरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावी. पावसाळ्यात ही अळी आढळते. या अळीच्या अंगावर बारीक केस असतात. त्याखाली काही विष ग्रंथी असतात.

यातूनच या आळ्या स्वसंरक्षणासाठी विशिष्ट रसायन सोडतात. या रसायनाचा त्वचेशी संपर्क झाला तर तीव्र वेदना होतात. यामुळे शेतकऱ्यांना याचा संपर्क आला तर अनेक अडचणी येतात. संपर्क भागात याचे चट्टे देखील दिसतात. ही अळी माणसाच्या अंगावर किंवा माणसाच्या दिशेने येत नाही. ॲलर्जी किंवा दम्याचा त्रास असणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात ही अळी आली तर तीव्र स्वरूपाची लक्षणे दिसतात.

दरम्यान, शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. आधीच अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आता मकाच्या पिकांवर घोणस अळीचे संकट उभे राहिले आहे. त्यातच घोणस अळी शेतकऱ्यांना चावा घेत असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक शेतकऱ्यांना चावा घेतल्याने शेतकऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.