हवामान अंदाज
मॉन्सून अंदमानात दाखल; पाच दिवस आधीच अंदमान, निकोबार बेटांवर हजेरी
दिनांक : 17-May-22
पुणे : नैॡत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) सोमवारी (ता. १६) अंदमानात आगमन झाले आहे. आणखी दोन दिवसांत मॉन्सून संपूर्ण अंदमान बेट समूह व्यापून बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात दाखल होण्याची शक्यता आहे. अंदमान, निकोबार बेटांवर पाच दिवस आधीच दाखल झालेला मॉन्सून २७ मे पर्यंत केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
नैॡत्येकडून येणाऱ्या वाऱ्यांचे वाढलेले प्रवाह, ढगांचे आच्छादन आणि पावसाच्या हजेरीने मॉन्सूनचे आगमन झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. सोमवारी (ता. १६) अंदमान, निकोबार बेटे आणि अंदमान समुद्राच्या बहुतांशी भाग, बंगालच्या उपसागराच्या काही भागात मॉन्सूनने व्यापला आहे. पुढील दोन दिवसांत संपूर्ण अंदमान बेटसमुह व्यापून बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
दीर्घकालीन आगमनाच्या वेळा लक्षात घेता मॉन्सून साधारणत: २१ मे पर्यंत अंदमानाची राजधानी पोर्टब्लेअर येथे पोचतो. त्यापूर्वीच तो दक्षिण अंदमान समुद्रात दाखल होतो. यंदा १५ मे रोजी मॉन्सून अदमान समुद्रात दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र मॉन्सून सोमवारी (ता. १६) अंदमानात दाखल झाला आहे.
मॉन्सूनचे केरळमधील आगमन २७ मे पर्यंत होण्याची शक्यता असून, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यंदा नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा ९९ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) १४ एप्रिल रोजी जाहीर केला होता. या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक पाऊस पडण्याची शक्यताही गृहीत धरण्यात आली आहे. मॉन्सून हंगामात ला-निना स्थिती राहण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.
स्त्रोत: अॅग्राेवन*