उन्हाळी भुईमुग
दिवसातला १० ते १२ तास भरपूर आणि स्वच्छ सूर्यप्रकाश योग्य वेळी पाणी पुरवठा, किडी- रोगांचा कमी प्रादुर्भाव इ. मुळे खरीपापेक्षा उन्हाळी भुईमुगाचे दीडदुपटीने जास्त उत्पादन मिळते. शिवाय ऐन उन्हाळ्याट जनावरांना पौष्टिक चार मिळतो आणि बेवड तसेच फेरपालट या दोन गोष्टी साध्य होतात.
सर्व प्रकारचे योग्य व्यवस्थापन केले तर उन्हाळी भुईमुगाचे जातीनिहाय उपट्या जातीचे वाळलेल्या शेंगाचे एकरी १० ते १२ क्विंटल आणि पसऱ्या जातीचे एकरी १२ ते १६ क्विंटल उत्पादन मिळते. शिवाय ढाळ्यांचा हिरवा अगर वाळवून पौष्टिक चारा २ ते ३ टन मिळतो. त्यामुळे ज्यांच्याकडे हमखास पाणीपुरवठा उपलब्ध आहे अश बांधवांनी नक्कीच उन्हाळी भुईमुग पेरावा.
भुईमुग हे उष्ण आणि कोरड्या हवामानातले पीक असून साधारणतः १८ ते ३० अंश सें.ग्रे. तापमानात हे पीक चांगले येते. उत्तम निचऱ्याच्या, मध्यम मऊ वाळूमिश्रित, चुनखडी युक्त, सेंद्रिय युक्त जमिनीत भुईमुगाचे पीक चांगले येते. ६.५ ते ७.५ इतका सामू असावा. भारी चिकन जमिनीत भुईमुगाचे पीक घेऊ नये. खरीपातले पीक काढल्यानंतर लगेचच हिवाळी नांगरट करावी. २-३ कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. एकरी ६ ते ७ टन कुजलेले शेणखत शेवटच्या कुळवाच्या पाळीच्या अगोदर टाकून मातीत मिसळून घ्यावे आणि जमीन पेरणीसाठी तयार करून ठेवावी.
उन्हाळी भुईमुगासाठी टीएजी २४, टीजी २६, आय. सी. जी. एस. ११, एसबी ११, फुले २८५, पसाऱ्यामध्ये एम १३ या अधिक उत्पादन देणाऱ्या आणि चांगल्या जाती आहेत. निवडलेल्या जातीचे निरोगी आणि टपोरे बियाणे निवडून त्याच्यावर १ टक्का पारायुक्त अॅगॅलॉल अगर सेरेसॉन २ ग्रॅम प्रतिकिलोस हळुवार चोळावे त्यानंतर रायझोबियमहे जीवाणूसंवर्धन २५० ग्रॅमची रबडी १० किलो बियाण्यास लावून सावलीत वाळवून मग पेरणी करावी.
पश्चिम महाराष्ट्रात जानेवारीच्या शेवटी आणि फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात उन्हाळी भुईमुगाची पेरणी करावी. कोकणात भात काढल्यानंतर रान तयार करून पेरणी करावी. कारण तिथे थंडी कमी असते तर विदर्भ मराठवाड्यात मार्चपर्यंत पेरणी करावी.
उन्हाळी भुईमुगाची पेरणी जमीन ओलवून वाफशावर आल्यानंतर दोन चाड्याच्या पाभरीने करावी. उपट्या जातीसाठी ३० × १० सें. मी. तर पसाऱ्या जातीसाठी ४५ × १० सें. मी. अंतरावर पेरणी करावी. उपट्या जातीचे एकरी ५० किलो प्रक्रिया केलेले बियाणे, तर पसाऱ्या जातीसाठी एकरी ४० किलो बियाणे वापरावे. पेरणी करताना १०० किलो डीएपी दुसऱ्या चाड्याने पेरावी. माती परीक्षणानुसार खते वापरावीत.
भुईमुगासाठी अमोनियम सल्फेट आणि सिंगल सुपर फोस्फेट, १० ते १२ किलो झिंक सल्फेट, २ ते ३ किलो बोरेक्स, पेरणीच्या वेळी द्यावे. १ ते १|| किलो फेरस सल्फेट ५०० लिटर पाण्यातुन उभ्या पिकावर फवारावे. खताच्या बाबतीत भुईमुग फुलावर येण्यापूर्वी साधारण ४० दिवसांनी एकरी १५० ते २०० किलो जिप्सम दोन ओळीत टाकून कोळप्याने मातीआड करावा आणि पाणी द्यावे.
भुईमुगाची उगवन झाल्यानंतर नांग्या पडल्या असतील तर बी टोकून नांग्या भरून घ्याव्यात. कारण एकरी १ ते १| लाख रोपं असणं फार महत्वाचं आहे. पहिल्या दीड महिन्यात दोन खुरपण्या आणि दोन कोळपण्या करून पीक तणविरहीत ठेवावे. भुईमुगाच्या सर्व प्रकारच्या आंतरमशागतीची कामे आऱ्या सुटण्याच्या अगोदर करावीत. शेवटची कोळपणी खोल आणि पासेला दोरी बांधून करावी.
याशिवाय ४० दिवसांनी आणि ५० दिवसांनी २०० लिटर पाण्याचा पत्र्याचा मोकळा ड्रम दोनदा फिरवावा म्हणजे सगळ्या आऱ्या जमिनीत घुसतात आणि त्यांना शेंगा लागतात.
वाफशावर भुईमुग पेरल्यानंतर ३-४ दिवसांनी उगवण चांगली होण्यासाठी हलकसं पाणी द्यावे. नंतर मात्र उन्हाळा असल्याने ८-१० दिवसांनी ६-७ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. फुलोऱ्यात आऱ्या सुटण्याच्या वेळी शेंगा दुधात असताना आणि भरताना ओलावा असणे फार महत्वाचे आहे. विशेषतः भुइमुगाला तुषार सिंचनाने पाणी देणे उत्पादनाच्या दृष्टीने फायद्याचे ठरते. उन्हाळी भुईमुगाची लागवड इक्रीसॅट पद्धतीने म्हणजे वरंबा, गादीवाफे पद्धतीने करावी. गादीवाफ्यावर प्लॅस्टिक मल्चिंग पेपरने लागवड केल्यास अधिक उत्पादन मिळते.
उन्हाळी भुईमुगावर फारशा किडी- रोगाचा प्रादुर्भाव होत नाही तरी पण मावा, तुडतुडे, फूलकडे, पान गुंडाळणारी अळी यांच्या नियंत्रणासाठी फॉस्फामिडान १२० मि. लि., क्वीनालफॉस १ लिटर सायपरमेथ्रीन २०० मि. लि. ५०० लिटर पाण्यातून आलटूनपालटून फवारावीत.
शेंडेमर रोगाच्या नियंत्रणासाठी फूलकिडीचे नियंत्रण केले पाहिजे. त्यासाठी फॉस्फामिडान फवारावे. टिक्का तांबेऱ्याच्या नियंत्रणासाठी डायथेन एम. ए. ४५ १२५० ग्रॅम अगर बाविस्टीन २५० ग्रॅम ५०० लिटर पाण्यातून फवारावे.
अश्या पद्धतीने उन्हाळी भुइमुगाचे व्यवस्थापन केल्यास एकरी सहजपणे वाळलेल्या शेंगाचे १० ते १५ क्विंटल उत्पादन येऊन जमिनीची सुपीकता, बेवड आण